सहकाराची घसरण थांबवण्यासाठी युवकांच्या सहभागाची गरज : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : “राज्यात सहकाराचे जाळे मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले असले, तरी सध्या या क्षेत्राला घसरण सुरू झाली आहे. ही घसरण थांबवण्यासाठी संस्था टिकवाव्या, वाढवाव्या लागतील आणि मुख्य म्हणजे या क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढला पाहिजे, तरच सहकार क्षेत्र तग धरणार आहे,” अशी अपेक्षा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे दहावे अधिवेशन येथील सिडनहॅम महाविद्यालयाच्या प्रागंणात झाले. या अधिवेशनाचे उदघाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता, संरक्षक सतीश मराठे, राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदयराव जोशी, प्रदेशाध्यक्ष संजय बिर्ला, सहकार भारती राष्ट्रीय महिला आघाडी प्रमुख संध्याताई कुलकर्णी, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, आमदार प्रवीण दरेकर, सहकार भारतीचे संस्थापक-सदस्य आणि ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव देवधर, सहकार सुंगंध मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.

अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार प्रदान

या वर्षीचा स्व. माधवराव तथा अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार संस्थापक-सदस्य आणि ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. वसंतराव देवधर यांना श्री. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख दहा हजार, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराबाबतची माहिती श्री. कुलकर्णी यांनी दिली. पुरस्कार प्रदान करताना स्व. माधवरावांच्या ज्येष्ठ कन्या सौ. वासंती पराडकर या उपस्थित होत्या. श्री. पाटील यांनी आपल्या भाषणात सहकाराच्या सध्याच्या स्थितीचा मागोवा घेतला आणि सहकाराने देशाच्या सर्व भागांत रोजगार व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले कीे, राज्यात सहकार रुजला, विस्तारला आणि एका उंचीवर पोहोचला, पण त्याला आता घसरण लागली आहे. त्याला अनेक कारणे आहेत. काही संस्था बंद पडल्या, काही अडचणीत आल्या, त्याला धोरणे आणि माणसे, पदाधिकारी जबाबदार आहेत, पण ही घसरण थांबली पाहिजे. अनुत्पादक कर्जांचा प्रश्‍न हेही त्याचे एक कारण आहे. यावर उपाय म्हणजे या क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढायला हवा.

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत विचार सुरू

शेतकरी वर्ग अडचणीत आहे, असे नमूद करून ते म्हणाले की, नापिकीमुळे कर्जाचे प्रमाण वाढले आहे. कर्जमाफीबाबत विचार सुरू आहे. परंतु यामुळे पूर्ण प्रश्‍न सुटणार नाहीत, पण शेतकरी सक्षम झाला पाहिजे. जलयुक्त शिवार योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्गाला मिळाला आहे. तरीही शेतकर्‍याना दीर्घमुदत गुंतवणुकीसाठी सहकारी संस्थांनी पतपुरवठा करण्याबाबत विचार करावा. मुळात आज कर्ज देणार्‍या काही संस्था अडचणीत आल्या आहेत. शासन विविध योजना आणत आहे. उत्पादन खर्च कमी करण्याबरोबर शेतीमालास हमी दर देणे, तसेच आर्थिक संस्थांनी पीक कर्ज वगळून कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करावे. शेतीपूरक उद्योगांच्या उभारणीतून रोजगार वाढेल. मुख्य म्हणजे सहकारी संस्थांनी किती माणसांना उभे केले, हा महत्त्वाचा  प्रश्‍न आहे. संस्थांची आकडेवारी, नफा-तोटा हे सर्व ठीक आहे; पण त्यापलीकडे माणूस उभा राहणे गरजेचे आहे.

समाजातील शेवटच्या घटकाचे हित, चांगला माणूस घडवणे, हा विचार स्व. लक्ष्मणराव इनामदार आणि पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी  मांडला. ग्रामीण माणसाचा एकात्मिक विकास हे त्यांचे ध्येय होते. एकात्म मानवतावाद हा केवळ पोटाचा, मनाचा विचार नाही, तर एकात्मिक मानवाचा आहे आणि हाच विचार आपणा सर्वांना पुढे न्यायचा आहे, असे आवाहन त्यांनी केले.

परिवर्तनाचे सक्षम माध्यम म्हणजे सहकार

सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री विजय देवांगण यांनी मनोगतामधून सहकार भारतीच्या वाटचालीचा मागोवा घेतला. ते म्हणाले कीे, परिवर्तनाचे एक सक्षम माध्यम म्हणजे सहकार क्षेत्र होय. त्या दृष्टीने चळवळीतील कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे. आपला देश समृद्ध, सबळ, होण्यासाठी सहकार क्षेत्र अधिक बळकट झाले पाहिजे. त्या दृष्टीने येत्या वर्षभरात विविध उपाययोजना तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. समाजात सहकारावरील विश्‍वास कमी होत आहे, अशी खंत व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, यामध्ये युवकांचा सहभाग वाढवता येईल आणि संघटनात्मक कार्यावर भर देण्याचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले.

सहकार भारतीच्या विस्तारीकरणावर भर

सहकार भारतीचे संरक्षक मराठे यांनी संघटन विस्तार, आगामी तीन वर्षार्ंतील कार्यक्रम, सहकार भारतीचा देशभरातील विस्तार यांवर सविस्तर विवेचन केले. गावपातळीपासून ते प्रदेश स्तरापर्यंत रचना, सदस्यतावृद्धी, कार्यकर्ता आणि संस्थासदस्य, समाजात संपर्क वाढवणे, सहकार भारतीच्या विचारांचे विस्तारीकरण यापुढील काळात मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले.

सहकार रथाचे उत्स्फूर्त स्वागत

सुरुवातीला ध्वजारोहण झाल्यावर सातारा जिल्ह्यातील खटाव येथून आलेल्या सहकार रथाचे पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सहकार भारतीचे संस्थापक स्व. लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या रथयात्रेचे खटाव ते मुंबई असे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसांचा प्रवास पूर्ण करून रथयात्रा मुंबईत पोहोचली. उदघाट्न सत्रात सुरुवातीला सहकार सुंगंधचे ज्येेष्ठ प्रतिनिधी विश्‍वासराव कुलकर्णी यांनी सहकार मंत्र म्हटला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी केले. ते म्हणाले की, सहकार चळवळीला बळ देण्याचे काम सहकार भारतीने हाती घेतले आहे आणि ते अव्याहत  सुरू आहे. या वेळी त्यांनी स्व. इनामदार जन्मशताब्दी वर्षानिमित्त हाती घेण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती सांगितली.

त्यानंतर प्रदेशाध्यक्ष संजय बिर्ला यांनी अध्यक्षपदाच्या तीन वर्षार्ंच्या काळातील कामकाजाचा मागोवा घेतला. सहकार सुंगंध मासिकाच्या वतीने काढण्यात आलेल्या विशेषांकाचे प्रकाशन आणि एकात्म मानव दर्शन या पुस्तिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. दुपारच्या सत्रात राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय मंडळ अध्यक्ष एम. एन. सुखदेव यांनी ‘सहकार आणि ग्रामीण विकास’ यावर भाषणाच्या माध्यमातून प्रकाश टाकला. एकदिवसीय अधिवेशनाच्या कामकाजाचे सूत्रसंचालन प्रदेशाचे सहसंघटनप्रमुख दिलीप पाटील यांनी केले. अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागांतून सुमारे 600 पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.