Back button

         नागरी सहकारी बँकांसाठी शिखर संस्था स्थापन करणार

                 – सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता

 

जळगाव: नागरी सहकारी बँकांसमोरील विविध आव्हाने आणि बदलत्या काळानुसार निर्माण होणार्‍या समस्या सोडविण्यासाठी या बँकांसाठी स्वतंत्र अशी शिखर संस्था स्थापन करण्याविषयीची प्रक्रिया सुरू आहे, असे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता यांनी सांगितले.

जळगाव जनता सहकारी बँक आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी श्री. मेहता बोलत होते.

येथील गांधीतीर्थ परिसरातील स्व. डॉ. अविनाश आचार्य सभागृहामध्ये झालेल्या परिषदेस बँकांचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक व अधिकारी मोठ्या संख्येेने उपस्थित होते. सहकार भारतीचे राष्ट्रीय संरक्षक सतीश मराठे, जळगाव जनता बँक अध्यक्ष प्राचार्य अनिल राव, सहकार भारती राष्ट्रीय महासचिव डॉ. उदयराव जोशी, अ. भा. बँक प्रकोष्ठ प्रमुख संजय बिर्ला, जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिल जैन, जळगाव जनता बँक मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

बँकिंग क्षेत्रात होत असणारे मोठे बदल, बदलते तंत्रज्ञान, उत्पन्नावरील निर्बंध आदी बाबींचा उल्लेख श्री. मेहता यांनी आपल्या भाषणात केला ते म्हणाले की, या समस्या सुटाव्यात आणि आधुनिक तंत्रज्ञानाची मदत उपलब्ध व्हावी, यासाठीच शिखर संस्थेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. सध्याच्या स्पर्धेच्या वातावरणात जो सक्षम असेल, तोच टिकणार आहे. नव्याने येऊ घातलेले एफआरडीआय विधेयक व आधुनिक तंत्रज्ञानाचा बँकिंग क्षेत्रावर वाढत असणारा प्रभाव याचाही विचार अनिवार्य झाला आहे. म्हणूनच शिखर संस्थेची स्थापना ही आवश्यक बाब बनली असून त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव रिझर्व्ह बँकेला देण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

युरोप आणि अमेरिकेत अशी संस्था कार्यरत आहे. त्या धर्तीवर भारतात अशी संस्था असायला हवी, अशी आमची भूमिका आहे. आरबीआयच्या मतानुसार खासगी बँकांसाठी अशी संस्था असेल, पण त्यात नागरी सहकारी बँकांचा समावेश नाही. त्यामुळे सध्या तरी खासगी बँकांसाठी संस्थेचा प्रयत्न सुरू आहे.

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता लहान स्वरूपातील नागरी सहकारी बँकांच्या अस्तित्वाचा लढा सध्या सुरू आहे, असे नमूद करून श्री. मेहता म्हणाले, ङ्गङ्घसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना कर्जरोखे अथवा शेअर्समधून निधी उभारण्याचे पर्याय खुले असतात. तरीही त्यांच्या एनपीएचे प्रमाण हे नागरी सहकारी बँकांच्या तुलनेमध्ये अधिक आहे. नागरी बँकांचे काम असले, तरी निधी उभारण्यास त्यांच्यावर नियंत्रणे आहेत. केवळ नफ्याच्या माध्यमातून निधी उभारता येणे शक्य आहे. नजीकच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर झाला, तरच अस्तित्व टिकणार आहे. वेळ आली तर प्रसंगी विलीनीकरण करणे अनिवार्य होणार आहे. नागरी सहकारी बँकांचे भवितव्य हे मुख्यत्वे पॉलिसी, प्रॉडक्ट, प्रायमिंग, आणि पीपल्स या चार गोष्टींवर अवलंबून असणार आहे. याचाही विचार झाला पाहिजे.फफ

चौकट

जळगावामध्ये आलो की, सहकार भारतीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष स्व. डॉ. अविनाश आचार्य यांची आठवण होते. सहकार भारतीचे संस्थापक स्व. लक्ष्मणराव इनामदार यांनी राष्ट्रासाठी जीवन समर्पित केले.

त्यांचे विचार आजही सहकार भारतीच्या कार्यात मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांनी अनेक स्वयंसेवक घडविले, त्यांना प्रशिक्षित केले. त्यातील एक नाव म्हणजे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी

नोटाबंदीची घोषणा झाल्यावर नागरी सहकारी बँकांनी नोटा जमा करण्यास नकार दिला, असे सांगण्यात येत होते. पण ही बंदी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर होती. पण नागरी बँकांवर बंदी नव्हती. परंतु याबाबतची माहिती अधिकार्‍यांना अथवा माध्यमांना नव्हती. परिणामी, नागरी सहकारी बँकांबाबत गैरसमज निर्माण झाले होते, असे श्री. मेहता यांनी स्पष्ट केले.

श्री. जैन म्हणाले की, नागरी सहकारी बँकांनी प्रगतीची कास धरताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे व्यवसायाचा विस्तार करावा पण मूल्यांशी चिकटून राहावे.

प्राचार्य अनिल राव यांनी प्रास्ताविकामध्ये दोन दिवसीय परिषदेची भूमिका मांडली आणि नागरी सहकारी बँकांच्या सद्य:स्थितीवर प्रकाश टाकला. केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता बँकेच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या सामाजिक कामांची माहिती त्यांनी दिली.

सहकार सुगंधचे जळगावचे ज्येष्ठ प्रतिनिधी श्री. विश्‍वासराव कुलकर्णी यांनी सहकार गीत सादर केले. जनता बँकेचे संचालक कृष्णा कामठे यांनी सूत्रसंचालन केले.

Back button